पीएमओने ट्विटरवर शेअर केला मुलांचा व्हिडीओ
नवी दिल्ली, 27 डिसेंबर (हिं.स.) : नाताळ सणाच्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शाळकरी मुलांना आपल्या निवासस्थानी भेट दिली. पंतप्रधानांनी या विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) आज, बुधवारी यासंदर्भातील व्हिडीओ ट्विटरवर (एक्स) शेअर केलाय.
पंतप्रधानांच्या निवासस्थानातील वास्तू आणि सौंदर्य पाहून मुलं खूप आनंदी दिसली. नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी ख्रिसमसनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दुपारी जेवणाला अनेकांनी हजेरी लावली. यामध्ये क्रीडापटू अंजू बॉबी जॉर्ज आणि अभिनेता डिनो मोरिया यांचा देखील पाहुण्यांमध्ये समावेश होता. पंतप्रधानांनी येथे सर्वांचे जोरदार स्वागत केले. लोकांशी संवाद साधला. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींना मुलांनी घेरलेले दिसत आहे. मुलांनी सर्वप्रथम मोदींना ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पंतप्रधान मुलांशी बोलले आणि पंतप्रधानांनी विचारले, तुम्ही पंतप्रधानांचे निवासस्थान पाहिले आहे का ? मुलांनी ‘नाही’ असे उत्तर दिल्यावर त्यांनी आपल्या टीमसोबत मुलांना पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी पाठवले. यावेळी पंतप्रधानांच्या निवासस्थानातील मीटिंग हॉलमध्ये ही मुले मस्ती करताना दिसली. पंतप्रधानांचे निवासस्थान पाहून खूप आनंद झाल्याचं मुलांनी सांगितले. ही आमच्यासाठी मोठी संधी होती. मला आशा आहे की भविष्यातही अशा अनेक संधी येतील. आम्ही खूप उत्सुक होतो असे मुलांनी म्हटलं. शेवटी मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
हिंदुस्थान समाचार
