राम मंदिरातील सोहळ्यासाठी बोलावले
नवी दिल्ली, 21 डिसेंबर (हिं.स.) : अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम मंदिरात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना निमंत्रण देण्यात आलेय. दरम्यान प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनमोहन सिंग या सोहळ्यात उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष आणि ट्रस्टचे पदसिद्ध सदस्य नृपेंद्र मिश्रा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख राम लाल आणि विहींपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. तसेच त्यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमाला दोघेही उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. नृपेंद्र मिश्रा यांनीही मनमोहन सिंह यांच्याशी भेटीची वेळ मागितली असता त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्रकृतीचे कारण त्यांची भेट होऊ दिली नाही.शिष्टमंडळाने माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली. तसेच त्यांना या सोहळ्याचे निमंत्रण दिले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याशिवाय, सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनाही आमंत्रित करण्यात आले. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना निमंत्रित केले जात नसल्याची माहिती आहे.
अभिषेक सोहळ्यानंतर प्रत्येक राज्याने मंदिरात जाण्यासाठी एक दिवस निश्चित केला जाईल. काही विशेष गाड्यांचीही व्यवस्था केली जाऊ शकते. उत्तर प्रदेशातील राज्यातील भाविकांसह मुख्यमंत्र्यांनाही दर्शनासाठी आमंत्रित केले जाईल.त्यांच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात येईल. सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी, सीपीआयचे सरचिटणीस डी राजा, बसपा प्रमुख मायावती आणि आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. अभिषेक सोहळ्यासाठी अयोध्येत भव्य बंदोबस्त ठेवण्यात आला. या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुमारे 8 हजार लोकांच्या मेळाव्याला संबोधित करतील. या अभिषेक समारंभासाठीच्या पाहुण्यांमध्ये उद्योगपती, शास्त्रज्ञ, अभिनेते, लष्करी अधिकारी आणि माजी पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते यांचा समावेश आहे. पाहुण्यांच्या यादीत तिबेटचे अध्यात्मिक नेते दलाई लामा, योगगुरू बाबा रामदेव, उद्योगपती अदानी समूहाचे गौतम अदानी, रिलायन्सचे मुकेश अंबानी, अभिनेते अमिताभ बच्चन, रजनीकांत, माधुरी दीक्षित, रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत रामाची भूमिका करणारे अरुण गोविल यांचा समावेश आहे.
हिंदुस्थान समाचार
