आगामी 31 तारखेला उपस्थित राहण्यास असमर्थ
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना लोकसभेच्या आचार समितीने 31 ऑक्टोबर रोजी हजर राहण्यासाठी समन्स पाठवले आहे.मात्र, महुआ मोईत्रा यांनी लोकसभेच्या आचार समितीसमोर हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. मोईत्रा यांनी ट्विटरवर (एक्स) ही माहिती दिली आहे.
महुआ मोईत्रा यांनी 31 ऑक्टोबरला आचार समितीसमोर हजर राहण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. महुआ मोइत्रा यांनी आरोपांच्या संदर्भात लोकसभेच्या आचार समितीच्या समन्सला उत्तर देताना सांगितले की, 5 नोव्हेंबरनंतर समितीच्या पसंतीच्या कोणत्याही तारखेला व वेळेत समितीसमोर प्रत्यक्ष हजर राहू शकते. महुआ मोईत्रा यांनी एक्सवर एक पत्र पोस्ट केले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आचार समितीच्या अध्यक्षांनी लाईव्ह टीव्हीवर माझे 31/10 समन्स जाहीर केले, जे मला अधिकृत पत्र संध्याकाळी 7.20 वाजता ईमेल केले. सर्व तक्रारी आणि स्वत:हून प्रतिज्ञापत्रेही प्रसारमाध्यमांना प्रसिद्ध करण्यात आली. माझ्या पूर्वनिर्धारित मतदारसंघातील कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर मी 4 नोव्हेंबर रोजी उत्तर देण्यासाठी समितीसमोर उपस्थित राहू शकते असे खा. मोईत्रा यांनी नमूद केलेय. दरम्यान, यापूर्वी समितीने गृहमंत्रालयाकडेमहुआ मोईत्रा यांच्या गेल्या 5 वर्षांतील परदेश दौऱ्यांचा तपशील मागवला होता. महुआ मोईत्रा देशाबाहेर कुठे गेल्या ? आणि त्यांनी याबाबत लोकसभेत माहिती दिली की नाही ? याची चौकशी समिती करणार आहे. यानंतर, त्यांचे लॉगिन त्यांच्या एमपी आयडीला जोडले जाईल. तसेच, महुआ मोईत्रा यांच्याशी संबंधित वादात आयटी मंत्रालयाकडून आधीच माहिती मागवण्यात आली आहे.
निशिकांत दुबे यांनी गेल्या आठवड्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून महुआ मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार केली आहे. तसेच, लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप निशिकांत दुबे यांनी केला. यानंतर दर्शन हिरानंदानी यांनी मोठा खुलासा केला. उद्योगपती गौतम अदानींबद्दल मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा यांचा वापर केल्याचे स्वतः दर्शन हिरानंदानी यांनी कबूल केले. केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी महुआ मोईत्रा यांच्या संसदीय लॉगिनचा वापर केल्याचेही दर्शन हिरानंदानी यांनी सांगितले. दुसरीकडे, महुआ मोईत्रा यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि लोकसभेच्या आचार समितीच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार असल्याचे महुआ मोईत्रा यांनी स्पष्ट केले आहे.
