जम्मू, विकसित भारतासाठी विकसित जम्मू-काश्मीरच्या निर्मितीची हमी मोदी देत आहेत, पण काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी जम्मू-काश्मीरला पुन्हा त्या जुन्या काळात घेऊन जाऊ इच्छित आहेत. काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीसारख्या घराणेशाही पक्षांनी जम्मू-काश्मीरचे जेवढे नुकसान केले तेवढे कोणीही केले नाही. मात्र कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीर मोकळा श्वास घेत आहे. येत्या पाच वर्षांत हा परिसर विकासाच्या नव्या उंचीपर्यंत पोहोचेल. अशी उधमपूरला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या माझ्या कुटुंबियांना हमी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
उधमपूर (जम्मू आणि काश्मीर) येथे आयोजित जाहीर सभेत त्यांनी विशाल जनसमुदायाला संबोधित केले. विकसित जम्मू-काश्मीरसह जम्मू-काश्मीरमधील सर्व जागांवर प्रचंड बहुमताने मतदान करण्याचे आवाहन केले. या सभेला जम्मू-काश्मीर प्रदेश भाजपा अध्यक्ष श्री रविंदर रैना, केंद्रीय मंत्री आणि उधमपूरचे भाजपा उमेदवार श्री जितेंद्र सिंह आणि जम्मूतील भाजपाचे उमेदवार श्री जुगल किशोर आणि पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. पंतप्रधानांनी काँग्रेसची मुघलवादी मानसिकता असल्याचे म्हटत इंडी आघाडीवर तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप लावला. देशविरोधी वक्तव्ये केल्याबद्दल आणि रामललाच्या प्रतिष्ठापनेचे निमंत्रण नाकारल्याबद्दल त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, ही निवडणूक देशात मजबूत सरकार स्थापन करण्यासाठीची निवडणूक आहे. या पक्षांनी सत्तेसाठी कलम ३७० ची अशी भिंत निर्माण केली होती की, दुसऱ्या राज्यातील व्यक्ती इथे येऊ शकत नाही. त्याच वेळी, लोकांमध्ये असा भ्रम पसरवला गेला की, जोपर्यंत कलम ३७० कायम आहे, तोपर्यंत त्यांचे प्राण वाचतील. पण जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या पाठिंब्याने आणि आशीर्वादाने मोदींनी कलम ३७० ची भिंत पाडून तिच्याशी संबंधित गोष्टी जमिनीत गाडून टाकल्या. मी काँग्रेससह देशातील कोणत्याही राजकीय पक्षाला आव्हान देतो की, ते कलम ३७० परत आणतील हे जाहीर करून दाखवावे, मग हा देश त्यांच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवले तर राज्यात आग लागेल आणि जम्मू-काश्मीर देशापासून वेगळे होईल, असे विरोधी आघाडीचे पक्ष म्हणायचे. मात्र जम्मू-काश्मीरच्या तरुणांनी या लोकांना आरसा दाखवला.
पंतप्रधान म्हणाले की, मी गेल्या पाच दशकांपासून जम्मू-काश्मीरच्या भूमीवर येत आहेत. १९९२ मध्ये लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी आम्ही आलो होतो, तेव्हा संपूर्ण परिसरातील माता-भगिनींनी आपले आशीर्वाद दिले आणि लोकांनी रस्त्यावर येऊन आमचे भव्य स्वागत आणि आदर केले होते. २०१४ मध्ये माता वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्यानंतर अनेक पिढ्यांनी जे त्रास सहन केले, त्यापासून मी जम्मू-काश्मीरला मुक्त करीन, अशी हमी मी याच मैदानावर दिली होती. आज जम्मू-काश्मीरमधील सर्व जनतेच्या आशीर्वादाने मी ती हमी पूर्ण केली आहे. दशकांनंतर ही पहिलीच निवडणूक आहे, जेव्हा दहशतवाद, फुटीरतावाद, दगडफेक, बंद आणि सीमेपलीकडून गोळीबार हे निवडणुकीचे मुद्दे नाहीत.
राम मंदिर हा भाजपासाठी निवडणुकीचा मुद्दा असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा नव्हता, नाही आणि राहणारही नाही. ज्या काळात देशात निवडणूक व्यवस्था नव्हती तेव्हापासून राम मंदिराचा संघर्ष सुरू होता. काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांचे नेते मोठमोठ्या बंगल्यात राहायचे, पण जेव्हा रामलल्लाचे तंबू बदलायची वेळ यायची, तेव्हा हे लोक दुर्लक्ष करायचे. पावसाळ्यात रामलल्लाच्या मंडपात पाणी गळायचे आणि रामलल्लाचे भक्त मंडप बदलण्यासाठी न्यायालयाच्या फेऱ्या मारत राहिले. मी काँग्रेसला विचारतो…तुमच्या सरकारच्या काळात राम मंदिराला तुमच्या पक्षाने विरोध केला होता, तेव्हा तो कोणत्या निवडणुकीचा मुद्दा होता? प्रभू रामाला काल्पनिक संबोधून काँग्रेसला कोणाला खूश करायचे होते?
