नागपूर, 18 ऑक्टोबर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण सुरू केले आहे. त्यासाठी काँग्रेस डाव्या मार्गदर्शकांची मदत घेते आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूरसह राज्याच्या विविध भागात अशा प्रकारचे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर शहरी नक्षलवाद्यांचे नियंत्रण असल्याचा केलेला आरोप खरा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2023 रोजी मध्यप्रदेशातील भोपाळ येथील सभेत म्हंटले होते की, काँग्रेस एक कंपनी बनली असून पक्षाने धोरणे, विचार आणि योजनांचे आऊट सोर्सिंग सुरू केलेय. एकूणच शहरी नक्षलवादी काँग्रेसचे संचालन करीत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला होता. त्या आरोपाला बळ देणारा घटनाक्रम राज्यात घडतोय. काँग्रेसचे भारत जोडो अभियान डाव्या विचारकांच्या संकल्पनेवर आधारित होते असे खुद्द पक्षांतर्गत सुत्रांनी सांगितले. तर सध्या डावे विचारक काँग्रेसच्या प्रशिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून नागपुरातील कस्तुरबा भवनात तुषार गांधी आणि योगेंद्र यादव यांचे मार्दर्शन झाल्याची माहिती काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांनी दिली.
काँग्रेसच्या भारत जोडो अभियान अंतर्गत ‘लोकसभा मिशन 24’ या नावाने सुरू असलेल्या प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण वर्गाचा काही तपशील पुढे आला आहे. त्यामधून काँग्रेस डाव्या विचारसरणीकडे मार्गक्रमण करण्यासाठी तयार होत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात सध्या ‘ट्रेनिंग ऑप ट्रेनर्स’ सुरू आहे. राज्यातील रत्नागिरी, पुणे, अकोला आणि नागपूरसह राज्याच्या इतर भागात हे प्रशिक्षण दिले जातेय. यापैकी रत्नागिरी आणि नागपुरात तीन दिवसांचे ऑनलाईन आणि दोन दिवसांचे ऑफलाईन प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. यामध्ये डावे विचारवंतआगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी बूथ स्तरापासून मतदार संघ स्तरापर्यंतचे नियोजन कसे करावे याचे प्रशिक्षण दिले आहे.
काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी आणि नागपूरच्या प्रशिक्षण वर्गात जे प्रेझेंटेशन आणि प्रशिक्षण दिले गेले, त्यात सरकारवर नाराज घटकांना शोधून त्यांचे तगडे नेटवर्किंग तयार करा, सरकारी धोरण विरोधी अभियान राबवा, त्याला गती द्या. कामगार, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी यांच्याशी संपर्क ठेवा असे सांगण्यात आले आहे. तसेच कायदेतज्ज्ञ, सोशल मिडीया इन्फ्लूएन्सर्स यांना आपल्या सोबत ठेवण्याबाबत देखील काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगण्यात आलेय. या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना जो मेसेज पाठवला जातो त्यामध्ये विविध सत्रात तज्ञ मार्गदर्शक म्हणून योगेंद्र यादव, शशिकांत सेंथिल, उल्का महाजन, संजय गोपाळ, असे लोक राहतील असे नमूद असते.
देशासाठी ही युती अभद्रच- एल.टी जोशी
यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक लक्ष्मणराव जोशी म्हणाले की, काँग्रेस आणि डावे जेव्हा एकत्र आलेत तेव्हा देशाच्या विरोधात जाणाऱ्या गोष्टी घडल्या आहे. डाव्या पक्षांनी 1967-68 मध्ये अल्पमतातील इंदिरा सरकारला बिनशर्त पाठिंबा देऊन त्यामोबदल्यात सर्व सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांवर कब्जा केला. त्यानंतर आता चिनच्या मदत आणि पुढाकारातूनच राहुल गांधी डाव्याना हाताशी धरून काँग्रेस चालवताहेत. राजकारणात प्रत्येक गोष्टींचे एक मूल्य असते. ज्यावेळी डावे आपल्या सहकार्याचा मोबदला घेतली त्यावेळी ती किंमत काँग्रेस सोबतच भारत आणि भारतीय समाजालाही चुकवाली लागेल ही शक्यता नाकारता येत नसल्याचे जोशी यांनी सांगितले.
