सीबीआयला कळवली उपस्थित राहण्यास असमर्थता
नवी दिल्ली : सीबीआयने उत्तरप्रदेशातील खाण घोटाळा प्रकरणाच्या तपासासाठी अखिलेश यादव यांना नोटीस बजावली होती. यात त्यांना साक्षीदार म्हणून चौकशीसाठी बोलावले होते. परंतु, अखिलेश यांनी चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिलाय. यासंदर्भात त्यांनी पत्र पाठवून सीबीआयला कळवले आहे.
खाण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने 21 फेब्रुवारीला अखिलेश यादव यांना नोटीस पाठवली होती आणि 29 जानेवारीला त्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावले होते. मात्र, आज गुरुवारी अखिलेश सीबीआयसमोर प्रत्यक्ष हजर राहणार नाहीत. सीबीआयला पाठवलेल्या उत्तरात त्यांनी सांगितले की, ते उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत आणि त्यांच्या लखनऊ येथील निवासस्थानी चौकशी केली जाऊ शकते. अखिलेश यादव यांनी आपल्या उत्तरात सीबीआयच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणी 2019 मध्ये एफआयआर नोंदवण्यात आला होता, मात्र गेल्या 5 वर्षात या प्रकरणी कोणतीही माहिती मागवण्यात आलेली नाही, आता अचानक सीबीआयने लोकसभा निवडणुकीपूर्वी नोटीस पाठवली आहे. मात्र, तपासात सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पक्षाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते या नात्याने उत्तर प्रदेशातील मतदारांप्रती त्यांचे संवैधानिक कर्तव्य असल्याचं अखिलेश यांनी म्हटले आहे. मात्र, मी तपासात सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
