नागपूर, 07 डिसेंबर (हिं.स.) : माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जींनी लिहीलेल्या “प्रणव : माय फादर” या पुस्तकाच्या मागे भाजपचा हात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. या पुस्तकात राहुल आणि सोनिया गांधींबाबत अनेक खुलासे करण्यात आले आहेत.
गेल्या 2 दिवसांपासून शर्मिष्ठा मुखर्जी लिखीत “प्रणव : माय फादर” या पुस्तकाची देशाच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले की, प्रणव मुखर्जी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि पक्षाने त्यांच्या क्षमतेला न्याय दिला. आता शर्मिष्ठाजी असे का बोलतात हे गुढ आहे. भाजप नेहमीच तिसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या लोकांना बदनाम करण्याचा छुपा अजेंडा राबवत असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला. राहुल गांधी अतिशय प्रामाणिक नेते असून भाजप राहुल यांना घाबरते. रणनीतीनुसार भाजप शर्मिष्ठा मुखर्जी यांच्या माध्यमातून राहुल गांधींना बदनाम करत असल्याचे वडेट्टीवर यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
