मुंबई, १४ जानेवारी (हिं.स.) : काँग्रेस नेते माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपल्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी असलेले ५५ वर्षांचे नाते मी संपवत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगितले.
देवरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आपण राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे. त्यात पुढे म्हटले की, आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाशी माझ्या कुटुंबाचे असलेले ५५ वर्षांचे नाते संपुष्टात आणले. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे अखंड पाठिंबा दिल्याबद्दल आभारी आहे.
मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबई मतदारसंघातून खासदार राहिले आहेत, मात्र सध्या उद्धव ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून या जागेवर दावा सांगितला जात आहे. त्यामुळे देवरा यांना या जागेवर उमेदवारी मिळण्याच्या आशा मावळल्या आहेत. त्यामुळे देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.
हिंदुस्थान समाचार
