मनमाड, 26 नोव्हेंबर (हिं.स.) : मनमाड-येवला राज्य महामार्गावर स्विफ्ट कार आणि ट्रकचा समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. त्यात कारमधील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अंकाईजवळील रेल्वे उड्डाणपुलावर हा अपघात घडला घडला. अपघातातील सर्व प्रवासी हे नाशिकमधील गंगापूर या ठिकाणचे असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे, प्रतीक नाईक असे ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. मनमाड जवळच्या म्हसोबा देवस्थान येथे धार्मिक कार्यक्रम उरकून येवलामार्गे नाशिककडे परतत असताना हा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या स्वीफ्ट कारने कंटनेनरला धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. या अपघाताच्या वेळी अवकाळी पाऊस आणि रात्रीच्या अंधारामुळे मदतकार्य राबवण्यास अडथळा येत होता. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
हिंदुस्थान समाचार
