प्रल्हाद पटेल, विजयवर्गीय यांचाही समावेश
भोपाळ, 25 डिसेंबर (हिं.स.) : मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगू भाई पटेल यांनी आज, सोमवारी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळातील 28 सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथ घेणाऱ्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय, माजी खासदार राकेश सिंह आणि उदय प्रताप सिंह यांचा समावेश आहे.
मध्यप्रदेशच्या डॉ. यादव मंत्रिमंडळात ओबीसी प्रवर्गातील 11 मंत्री असून 9 मंत्री सर्वसाधारण गटातील आहेत. तर एससी आणि एसटी प्रवर्गातून प्रत्येकी 4 जणांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. ओबीसी प्रवर्गातील मंत्र्यांमध्ये प्रल्हाद पटेल, कृष्णा गौर, इंदरसिंग परमार, नरेंद्र शिवाजी पटेल, लखन पटेल, आंदल सिंग कंसाना, नारायण सिंह कुशवाह, धर्मेंद्र लोधी, नारायण पवार, राव उदय प्रताप, धर्मेंद्र लोधी यांच्या नावांचा समावेश आहे. तर सामान्य प्रवर्गातील (जनरल कॅटेगिरी) मंत्र्यांमध्ये गोविंद सिंग राजपूत, प्रद्युम्न सिंग तोमर, विश्वास सारंग, कैलाश विजयवर्गीय, राकेश सिंग, चेतन्या कश्यप, राकेश शुक्ला, हेमंत खंडेलवाल, दिलीप जैस्वाल यांचा मोहन मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. यासोबतच अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) प्रतिमा बागरी, तुलसी सिलवट, गौतम टेंटवाल आणि दिलीप अहिरवार मंत्री झाले असून अनुसूचित जमातीतून (एसटी प्रवर्ग) संपतिया उईके, राधा सिंह, विजय शहा आणि निर्मला भुरिया यांना मंत्री बनवण्यात आलेय. राज्य मंत्रिमंडळाच्या 28 मंत्र्यांपैकी 18 कॅबिनेट दर्जाचे, 6 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 4 राज्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री (मोहन यादव) आणि दोन उपमुख्यमंत्री (राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवरा) यांच्यासह मंत्रिमंडळाचे एकूण संख्याबळ आता 31 झाले आहे.
हिंदुस्थान समाचार
