* तीन चिमुकल्यांचा समावेश
पुणे, १८ डिसेंबर (हिं.स.) : नाशिक-कल्याण आणि नाशिक-पुणे या महामार्गांवर जुन्नर आणि संगमनेर या भागांत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत एकूण १२ जण ठार झाले आहेत. यात तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. दरम्यान अपघातात एक महिला आश्चर्यकारक बचावली आहे. या अपघातांमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच अपघातात मृत झाल्याचे वृत्त समजल्यावर त्यांचे कुटुंबीय आणि गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (१७ डिसेंबर) रात्री १०.३० वाजण्याच्या दरम्यान भाजीपाला वाहतूक करणारी पिकअप (एमएच १४ एचजी १९४०) ही ओतूरकडून कल्याणकडे जात होती. तेव्हा कल्याणकडून ओतूरकडे येणारी प्रवासी रिक्षा (एमएच ०३ बीवाय ९०२३) यांच्यात नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे व पिंपळगाव जोगा गावच्या सीमेवर पेट्रोलपंपासमोर अपघात झाला. या अपघातानंतर पिकअप अत्यंत वेगाने डाव्या बाजूस घसरत जाऊन कल्याणकडून येणाऱ्या ट्रक (एमएच १६ डीसी ११६०) यास जोरदार धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये पिकअप चालक व कॅबिनमध्ये बसलेली त्याची पत्नी, मुलगा, मुलगी व मागे बसलेला हमाल असे सर्व जण मृत्यूमुखी पडले. रिक्षामधील तीन आणि पिकअपमधील ५ अशा ८ जणांचा या अपघातात मृत्यू झाला, अशी माहिती ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.
अपघातातील ओळख पटलेल्या पिकअपमधील व्यक्तींमध्ये गणेश मस्करे (३०, चालक), कोमल मस्करे (२५, चालकाची पत्नी), हर्षद मस्करे (४, चालकाचा मुलगा), काव्या मास्करे (६, चालकाची मुलगी, सर्व रा. मढ ता. जुन्नर, जि पुणे) आणि ५) अमोल ठोखे (रा. जालना). तसेच रिक्षामधील मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये नरेश दिवटे (६६, चालक, रा. पेडे परशुराम, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) तर इतर दोन मृतांची ओळख पटलेली नाही.
दुसऱ्या घटनेत पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगावकडून संगमनेरच्या दिशेने अकोले तालुक्यातील काही जण कारने (एमएच १७ एजे २६९६) येत होते. चंदनापुरी शिवारातील जावळे वस्तीजवळ असणाऱ्या हॉटेल पांडुरंगजवळ रविवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास ही कार पलटी होऊन अपघात झाला. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने नाशिककडे जाणाऱ्या मालवाहतूक कंटेनरने (युपी २४ टी ८५५०) थेट पलटी झालेल्या कारला धडक दिली. कंटेनरखाली कार चेपल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सुरेश धारणकर (४२), सुनील धारणकर (६५), अभय धारणकर (४५) आणि ओजवी धारणकर (२ वर्षे) हे सर्व रा कुंभेफळ ता. अकोले येथील असून चारही जण गंभीरित्या जखमी झाले होते. परंतु पुढे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
