छत्रपती संभाजीनगर, ३१ डिसेंबर (हिं.स.) : वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीला आग लागली. या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर, चौघांनी स्वतःचा जीव वाचवला.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज औद्योगिक परिसरात सनशाईन एंटरप्राईज सी 216 या हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीमध्ये सुमारे २०-२५ कामगार काम करतात. १० कामगार कंपनीमध्ये राहतात. सगळे झोपेत असताना शनिवारी मध्यरात्री अचानक आग लागली. झोपलेल्या काही कामगारांना गरम वाफ लागल्याने जाग आली, तेव्हा त्यांना आग लागल्याचे दिसले. यानंतर जीव वाचण्यासाठी कामगारांची पळापळ सुरू झाली.
कंपनीतून बाहेर पडण्याच्या ठिकाणी आग लागल्याने आतमध्ये असलेल्या कामगारांना बाहेर पडणं शक्य नव्हतं, पण काही कामगारांनी पत्र्यावरून एका झाडाच्या साहाय्याने सुखरुप बाहेर पडण्यात यश मिळवले. मात्र भल्ला शेख, कौसर शेख, इक्बाल शेख, मगरुफ शेख आणि अन्य दोन, अशा सहा कामगारांचा आगीत होरपळून आणि गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.
आगीतून सुखरूप बचावलेला कामगार अली अकबर याने घडलेला प्रकार सांगितला. अली अकबरने सांगितले की, काम बंद करून आम्ही झोपी गेलो होतो. मध्यरात्री आम्ही पांघरून घेऊन झोपलो असता, आम्हाला गरमी झाल्याने जाग आली आणि आजूबाजूला पाहतो तर सगळीकडे आग पसरली होती. आम्ही आरडाओरड करत इतरांना जागे करण्याचा प्रयत्न केला. कंपनीतून बाहेर पडण्याच्या दरवाजाच्या बाजूने आग लागल्याने आगीतून बाहेर पडणं कठीण झालं होतं. त्यानंतर काही कामगारांनी वरती चढून पत्र्यावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. चार जण सुखरुप बाहेर पडले.
अग्निशमन अधिकारी मोहन मुनसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला २.१५ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तिथे पोहोचल्यानंतर फॅक्टरीत आग धुमसत होती.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगीमध्ये सहा जण अडकल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी कुलिंग करून आतमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. पहाटे चार वाजेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते, त्यानंतर आग विझवण्यात यश आले.
हिंदुस्थान समाचार
