रायपूर, 04 नोव्हेंबर (हिं.स.) : छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील नारायणपूर येथे आज, शनिवारी नक्षलवाद्यांनी भाजप नेत्यांची हत्या केली. रतन दुबे असे भाजप नेत्याचे नाव असून ते नारायणपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी होते.
यासंदर्भातील पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार भाजपा नेते रतन दुबे हे आज, शनिवारी नारायणपूरच्या कौशल नार गावात भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेत होते. यावेळी अचानक नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात रतन दुबे यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना भाजप नेते ओमप्रकाश माथूर म्हणाले की, नक्षलवादी हताश झाले आहेत. त्यांना भीती वाटत आहे की, जर छत्तीसगडमध्ये भाजपाची सत्ता आली तर आपण जिवंत राहणार नाही. त्यामुळे ते ‘टार्गेट किलिंग’ करत आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे. त्यामुळे माझे सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, या सर्व बाबींचा सामना करत आपण निवडणुकीत ठामपणे उभे राहू आणि निवडून येऊ आणि येत्या काळात नक्षलवाद्यांची समस्या समूळ नष्ट करू असे माथूर म्हणाले.
हिंदुस्थान समाचार
