अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा लागली पणाला
रायपूर, 17 नोव्हेंबर (हिं.स.) : छत्तीसगड विधानसभेच्या उर्वरित 70 जगांसाठी आज, शुक्रवारी सकाळी 7 वाजेपासून मतदान सुरू आहे. हे मतदान संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर राज्यातील नक्षग्रस्त बिंद्रनवागड येथे दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मदतान निवडणुकीत मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठीच्या दुसऱ्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत सुमारे 20 टक्के मतदान झाले आहे. या टप्प्यातही अनेक हायप्रोफाइल जागा आहेत. मुख्यमंत्री भूपेश बघेल, उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव आणि विधानसभा अध्यक्ष डॉ. चरणदास महंत यांच्यासह 10 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रदेशाध्यक्ष अरुण साव यांच्यासह भाजपचे 4 खासदार आणि 10 आमदारही रिंगणात आहेत. जेसीसीजेचे प्रदेशाध्यक्ष अमित जोगी आणि त्यांची आई आणि आमदार रेणू जोगी हेदेखील निवडणूक लढवत आहेत. दुसऱ्या टप्प्यात 958 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. पहिल्या टप्प्यात 12 नोव्हेंबरला 20 जागांवर 78 टक्के मतदान झाले. निवडणुकीचे निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर होतील.
हिंदुस्थान समाचार
