नागपुरातील काँग्रेसच्या महारॅलीत राहुल गांधींचा सवाल
नागपूर, 28 डिसेंबर (हिं.स.) : पंतप्रधान म्हणतात की ते ओबीसी आहेत, नंतर त्यांना प्रश्न विचारल्यावर सांगतात की भारतात गरीबी ही एकच जात आहे. असे असेल तर नरेंद्र मोदी ओबीसी कसे ? असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. यावेळी त्यांनी केंद्रात सत्ता मिळाल्यास जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले. काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी नागपुरात आयोजित कार्यक्रमात राहुल बोलत होते.
याप्रसंगी राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला ओबीसी असल्याचे सांगतात. त्यांचे सरकार हे ओबीसी असल्याचे पंतप्रधान म्हणाले होते. मग त्यांना आम्ही विचारले की, त्यांच्या सरकारमध्ये किती ओबीसी लोक आहेत ? त्यांच्या सरकारमध्ये किती अधिकारी हे ओबीसी अधिकारी आहेत ? त्यानंतर ते म्हणाले की देशात फक्त एकच जात आहे आणि ती म्हणजे गरीबी. मग असे असेल तर तुम्ही स्वतःला ओबीसी कसे काय म्हणवून घेता ? असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला. सरकारवर टीका करताना राहुल म्हणाले की, केवळ 90 लोक देशाचा कारभार चालवतात. यामध्ये आएएस अधिकारी आहेत. देशाच्या अर्थसंकल्पाचे नियोजन हेच लोक करीत असतात. या 90 लोकांमध्ये किती अधिकारी हे ओबीसी आणि दलित आहेत याची माहिती घेतली. त्यामधील फक्त 3 अधिकारी हे ओबीसी असल्याची माहिती पुढे आलीय. ही वस्तुस्थीती असेल तर मग हे सरकार ओबीसींचे कसे ? भारतातील सर्वात मोठ्या कंपन्या असतील, त्यामध्ये किती ओबीसी समाज आणि दलित आहेत हे सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी राहुल यांनी यावेळी केली. स्वातंत्र्यापूर्वी भारतात ब्रिटिशांचे राज्य आणि राजेशाही होती. त्यावेळी राजा म्हणेल ते खरे अशी स्थिती होती. वर्तमानात देखील देशात तशीच परिस्थिती आहे. कुणाचेच ऐकून घ्यायचे नाही हा नरेंद्र मोदी यांचा स्वभाव आहे अशी टीका राहुल यांनी केली. पूर्वी दलितांना स्पर्श केला जायचा नाही, ही संघाची विचारधारा असून सध्या देशाला त्याच मार्गावरून नेले जात असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.
याप्रसंगी राहुल गांधी म्हणाले की, मागे मला एक भाजपचा खासदार भेटला. तो म्हणाले की राहुलजी, मी भाजपमध्ये असलो तरी मला सहन होत नाही, माझे मन काँग्रेसमध्ये आहे. मी म्हणालो की शरीर भाजपमध्ये आहे आणि मन काँग्रेसमध्ये, तर मग काँग्रेसमध्ये यायला मन का नाही होत का ? त्यावर तो म्हणाला की, भापजपमध्ये गुलामी आहे. वरून आदेश आला की ते करावे लागते. भाजपची कार्यपद्धत ही वरून आदेशाचे पालन करणारी आहे. काँग्रेसची पद्धत याच्या अगदी विरुद्ध आहे. आमच्या पक्षात साधा कार्यकर्ताही नेत्यांना विरोध करू शकतो. अनेक कार्यकर्ते मला म्हणतात की ही गोष्ट आम्हाला मान्य नाही. त्यावर मी त्यांचे ऐकून घेतो. काँग्रेसमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही असल्याचा दावा राहुल यांनी केला.
स्वातंत्र्यापूर्वी या देशात पाचशे-सहाशे राजे आणि इंग्रजांचे राज्य होते. त्यावेळी सामान्य जनता भरडली जात होती. त्यावेळी त्यांच्या हातात सर्व अधिकार एकवटले होते. राजे मनमानी पद्धतीने काम करायचे. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संगाने कधीही भारतीय राष्ट्रध्वजाचा मान ठेवला नाही. परंतु, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कारावास भोगला. स्वातंत्र्यानंतर देखील काँग्रेसने सर्वांना समान मानले आणि प्रत्येकाला मताचा अधिकार दिला. सर्वसामान्य असो वा दलित, आदिवासी असो, किंवा राजा असो, सर्वांनाच काँग्रेसने एका मताचा अधिकार दिला आणि सर्वांना समान पातळीवर आणले. काँग्रेसची लढाई फक्त त्यावेळी ब्रिटिशांशी नव्हती, तर त्या वेळच्या राजा-महाराजांशी देखील होती. त्यावेळी दलितांना स्पर्शही केला जात नव्हता, आम्ही ते सगळे बंद केले. आता पुन्हा देशाला त्या मार्गाने नेले जात आहे. यावेळी राहुल गांधींनी अग्नीवीर योजनेवर देखील टीका केली. या योजनेच्या माध्यमातून भाजपने तरूणांची थट्टा चालवल्याचा आरोप त्यांनी केला.
हिंदुस्थान समाचार
