नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर (हिं.स.) : देशातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात, तसेच देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यात पोलीस दलांचे योगदान अमूल्य आहे. नवीन तंत्रज्ञान आणि समाज माध्यमांच्या प्रभावामुळे परिस्थिती झपाट्याने बदलते आहे. सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा गुन्हेगारांकडून वापर केला जातो, त्यामुळे डीप-फेकसारख्या समस्या समोर येत आहेत. त्यावर मात करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती असणे, तसेच त्यांनी गुन्हेगारांच्या चार पावले पुढे राहणे आवश्यक आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
भारतीय पोलीस सेवेतील 75 RR (2022 तुकडी) च्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांच्या गटाने राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
प्रत्येक नागरिकाची प्रतिभा आणि क्षमता विकसित करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. राष्ट्र विकासाच्या वाटचालीत सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, ही आपली राष्ट्रीय प्राथमिकता आहे. अमृत काळात देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी पोलीस अधिकारीही निर्णायक भूमिका बजावतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पोलीस प्रशासन तसेच कायदा आणि सुव्यवस्थेची मुख्य जबाबदारी राज्य सरकारांवर आहे. परंतु भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी हे राज्य सरकारांनी नियुक्त केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करतात. अशा प्रकारे देशाच्या पोलीस यंत्रणेला एका सूत्रात गुंफण्याचे काम भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी करतात, असेही त्या म्हणाल्या.
हिंदुस्थान समाचार
