नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्याचे प्रकरण
नवी दिल्ली, 09 जानेवारी (हिं.स.) : रेल्वेत नोकरीच्या मोबदल्यात जमीन घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, मंगळवारी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले. यामध्ये बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, मिसा भारती, हिमा यादव, हृदयानंद चौधरी आणि अमित कात्याल यांच्या नावाचा समावेश आहे.
ईडीने आरोपपत्रात 2 कंपन्यांनाही आरोपी केले आहे. राऊस एव्हेन्यू कोर्ट आगामी 16 जानेवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. या प्रकरणी ईडीचे हे पहिले आरोपपत्र आहे तर सीबीआयने यापूर्वी 3 आरोपपत्र दाखल केले आहेत. राबडी देवी, मिसा भारती, हेमा यादव आणि हृदयानंद चौधरी यांना अटक करण्यात आलेली नाही, असे ईडीने न्यायालयाला सांगितले. याशिवाय या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून पुढील पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाईल, असेही ईडीने न्यायालयाला सांगितले. सध्या दाखल करण्यात आलेले आरोपपत्र 4751 पानांचे आहे. राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद आणि त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांच्याशी संबंधित असलेल्या अमित कात्याल यांना नोकरीसाठी जमीन घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात तपास यंत्रणेने ताब्यात घेतले आहे.
ईडीच्या म्हणण्यानुसार, केंद्रात यूपीए-1 सरकार असताना तत्कालिन रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या कार्यकाळात हा घोटाळा झाला होता. आरोप झाल्यानंतर, लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिलेल्या जमिनीच्या बदल्यात 2004 ते 2009 दरम्यान भारतीय रेल्वेच्या विविध भागात ग्रुप-डी पदांवर अनेकांची नियुक्ती करण्यात आल्याचे उघड झाले. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (सीबीआय) दाखल केलेल्या प्राथमिक तक्रारीनंतर ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
हिंदुस्थान समाचार
