दिशा सालियान संशयास्पद मृत्यूचे प्रकरण
नागपूर, 07 डिसेंबर (हिं.स.) : मुंबईतील दिशा सालियान संशयास्पद मृत्यू प्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी होणार आहे. गेल्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. गेले वर्षभर हे प्रकरण शांत असले तरी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या प्रकरणावर चर्चा सुरू झाली असून राज्य सरकार आज, गुरुवारी संध्याकाळी याबाबत नव्याने आदेश जारी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात एसआयटी पथक काम करणार आहे.
मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान हिचा 8 जून 2020 रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून 8 जूनच्या मध्यरात्री दिशा खाली पडली होती. या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. शवविच्छेदन करण्यास 2 दिवसांचा विलंब का झाला ? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू होता. पण सीबीआयने या प्रकरणात कोणताही राजकीय अँगल नाही, दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला आहे, असा निष्कर्ष तपासाअंती काढला होता. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयनं वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आले होते.
दिशा सालियान प्रकरणात काही आमदार सातत्याने आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी करत होते. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2022 च्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्यानं उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या एसआयटी चौकशीत अनेक पुरावे समोर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हिंदुस्थान समाचार
