इस्लामाबाद , 16 फेब्रुवारी (हिं.स.)।बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने फोटो आणि व्हिडिओ जारी करत सांगितले आहे की त्यांच्या ताब्यात सध्या पाकिस्तानच्या 7 सैनिकांना बंधक ठेवले आहे. बलुचिस्तान प्रांतात दीर्घकाळापासून सक्रिय असलेल्या अनेक बंडखोर गटांपैकी सर्वात प्रभावी मानल्या जाणाऱ्या बीएलएने पाकिस्तान सरकारला एक आठवड्याची मुदत दिली आहे. त्यांनी इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास या सात सैनिकांना “बलुच नॅशनल कोर्ट” च्या आदेशानुसार मृत्युदंड दिला जाईल.
दरम्यान, बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तान सैन्याविरुद्ध आक्रमक मोहीम सुरू केली असून तिला “ऑपरेशन हेरोफ फेज 2” असे नाव दिले आहे. 14 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या निवेदनात बीएलए ने म्हटले की या मोहिमेदरम्यान त्यांच्या स्वातंत्र्यसैनिकांनी एकूण 17 पाकिस्तानी सैनिकांना पकडले होते. प्राथमिक चौकशीनंतर त्यांपैकी 10 सैनिकांना सोडण्यात आले, कारण ते बलुच वंशाचे होते आणि स्थानिक पोलिसांशी संबंधित होते. “हा निर्णय स्थानिक परिस्थिती, ओळख आणि बलुच जनतेच्या हिताचा विचार करून घेतला गेला,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पुढे असेही सांगण्यात आले की पाकिस्तानी सैन्याच्या नियमित युनिटमधील उर्वरित 7 सैनिक अद्याप बीएलए च्या ताब्यात आहेत. त्यांच्या विरोधात बलुच नॅशनल कोर्टात औपचारिक सुनावणी झाली असून त्यांच्यावर युद्धगुन्हे, नागरिकांविरोधातील कारवाया, जबरदस्तीने बेपत्ता करण्यास मदत व प्रोत्साहन देणे, तसेच बलुच नरसंहारात सहभाग अशा आरोपांचा समावेश आहे. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान त्यांना स्वतःची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली, पुरावे सादर करण्यात आले आणि कबुलीजबाब नोंदवले गेले. सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले असल्याचे बीएलए ने म्हटले आहे.
बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तान सरकार आणि लष्कराला सात दिवसांची मुदत दिली आहे. या सात सैनिकांच्या सुटकेच्या बदल्यात काही अटी घालण्यात आल्या असून, सात दिवसांच्या आत बलुच कैद्यांची सुटका केल्यास या सैनिकांना मुक्त केले जाऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. बीएलए च्या निवेदनानुसार, जर एका आठवड्यात पाकिस्तानने ही अट मान्य केली नाही, तर दिलेला मृत्युदंड अमलात आणला जाईल. दरम्यान, हे निवेदन 14 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आले होते. त्यामुळे दिलेली एक आठवड्याची मुदत 21 फेब्रुवारी रोजी संपणार आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
