ओस्लो, 10 ऑक्टोबर (हिं.स.)।जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि चर्चेत असलेल्या नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा शुक्रवारी(दि.१०) करण्यात आली असून या वर्षीचा ‘नोबेल शांतता पुरस्कार’ मारिया कोरिना मचाडो यांना मिळाला आहे. यासोबतच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या पुरस्कारापासून वंचित राहिले आहेत. या वर्षीच्या नोबेल पुरस्कारासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना अनेक देशांनी नामांकित केले होते. मात्र, त्यांच्या आशांवर पाणी फिरले.
मारिया कोरिना मचाडो यांना वेनेझुएलाच्या जनतेसाठी लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या अथक कार्यासाठी, तसेच हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततेच्या मार्गाने संक्रमण साधण्याच्या त्यांच्या संघर्षासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. मारिया कोरिना मचाडो यांना सुमारे 1.2 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे १० कोटी रुपयांहून अधिक) किमतीचा नोबेल शांतता पुरस्कार १० डिसेंबर रोजी नॉर्वेच्या ओस्लो शहरात प्रदान केला जाईल. या दिवशी स्वीडिश उद्योजक अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी देखील आहे. त्यांनीच १८९५ मध्ये नोबेल पुरस्कारांची स्थापना केली होती.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या पुरस्काराबाबत मोठी अपेक्षा होती. ट्रम्प यांनी दावा केला होता की, २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार त्यांनाच मिळायला हवा. ट्रम्प यांनी सार्वजनिक व्यासपीठांवरून वारंवार सांगितलं होतं की, त्यांनी अनेक देशांमध्ये युद्ध थांबवण्याचे काम केले आहे, त्यामुळे ते या पुरस्काराचे खरे हकदार आहेत. मात्र, ट्रम्प यांना या हा पुरस्कार मिळालेला नाही. नोबेल समिती नेहमी अशा व्यक्तींना किंवा संस्थांना निवडते, ज्या दीर्घकालीन शांततेसाठी कार्य करत असतात. त्यामुळे तज्ञांचे आधीच मत होते की ट्रम्प यांना पुरस्कार मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
