कीव, 24 सप्टेंबर (हिं.स.)। रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अद्यापही सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहेत. अशा पार्श्वभूमीवर, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी भारताबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. झेलेन्स्की म्हणाले की, “भारत बहुतांश वेळा आमच्या बाजूने आहे. ऊर्जा विषयक काही मुद्द्यांवर आमचे मतभेद आहेत, पण ते सोडवले जाऊ शकतात.”
झेलेन्स्की म्हणाले की, युरोपने भारतासोबत मजबूत संबंध निर्माण करायला हवेत, कारण भारताला दुर्लक्षित करता येणार नाही. इतकंच नव्हे तर यापूर्वी झेलेन्स्की यांनी असंही म्हटलं होतं की, चीनने रशियावर दबाव आणायला हवा जेणेकरून हे युद्ध थांबवता येईल. त्यांनी स्पष्ट केलं की, “जर चीन खरोखरच हे युद्ध संपवू इच्छित असेल, तर त्याने रशियावर प्रभाव टाकायला हवा.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता आणि युक्रेनमधील ताज्या घडामोडींवर आपले विचार शेअर केले होते. झेलेन्स्की यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) हँडलवर पोस्ट करत म्हटलं होतं, “मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. मी त्यांना वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या चर्चेबाबत सांगितले, ज्यामध्ये युरोपियन नेत्यांनीही सहभाग घेतला होता. ही एक उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण चर्चा होती, जिथे भागीदार देशांनी खरी शांतता कशी साध्य करावी यावर एक सामायिक दृष्टिकोन मांडला.
मॉस्कोने नागरिक भागांवर निषेधार्ह हल्ले केले आहेत आणि आमच्या डझनभर लोकांचा जीव घेतला आहे. मी पंतप्रधान मोदी यांचे पीडितांच्या कुटुंबीयांप्रती आणि त्यांच्या प्रियजनांप्रती सहवेदना व्यक्त केल्याबद्दल आभार मानतो.”
याशिवाय, गेल्या आठवड्यात झेलेन्स्की यांनी ही माहिती दिली होती की, रशियाने युक्रेनच्या आतल्या लक्ष्यांवर 3,500 पेक्षा अधिक ड्रोन, 2,500 पेक्षा अधिक शक्तिशाली ग्लाइड बॉम्ब्स आणि सुमारे 200 क्षेपणास्त्र डागली आहेत.त्यांनी असंही म्हटलं होतं की, “आता वेळ आली आहे की आपण युरोपच्या आकाशाचे संयुक्त संरक्षण एक बहुअंगी वायु संरक्षण प्रणालीद्वारे करावं. यासाठी लागणाऱ्या सर्व तंत्रज्ञान उपलब्ध आहेत.”
राष्ट्रपती झेलेन्स्की पुढे म्हणाले होते, “आम्हाला गुंतवणूक आणि इच्छाशक्तीची गरज आहे. आमच्या सर्व भागीदार देशांकडून आम्हाला ठोस कृती आणि निर्णायक पावलं अपेक्षित आहेत.”
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
