बँकॉक, 28 जुलै (हिं.स.) : बँकॉकमधील एका बाजारात हल्लेखोराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर त्या हल्लेखोराने स्वत:वरही गोळी झाडून घेतली. मृतांमध्ये बाजारपेठेतील चार सुरक्षा रक्षक, एक महिला आणि हल्लेखोराचा समावेश आहे. या गोळीबारात कोणताही पर्यटक मारला गेला नाही, अशी माहिती मिळतेय. थायलंडची राजधानी बँकॉकमधील लोकल फ्रेश फूड मार्केटमध्ये ही घटना घडली आहे.
हा सामूहिक गोळीबाराचा प्रकार असून हल्लेखोराने गोळीबार का केला यामागील कारण शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे, असे बांग सु जिल्ह्याच्या पोलीस दलाचे उपप्रमुख वोराफत सुकथाई यांनी सांगितले.थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर सुरू असलेल्या युद्धाशी या घटनेचा काही संबंध आहे का, याचा तपासही पोलीस करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
थायलंडमध्ये या आधीही झाला होता गोळीबार
थायलंडमध्ये या आधीही गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. मे २०२५ मध्ये यू थोंग जिल्ह्यातील बन डॉन सबडिस्ट्रिक्टमध्ये एका ३३ वर्षीय व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार करत यात तीन लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश होता.तर, ऑक्टोबर २०२३ मध्ये बँकाॅकमधील सियाम पॅरागॉन मॉलमध्ये एका १४ वर्षीय मुलाने केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला होता. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले होते.
——————
हिंदुस्थान समाचार / मेघा माने
