इस्लामाबाद, 20 जुलै (हिं.स.)।पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवादी संघटने ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) संघटनेचा पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी बचाव केला आहे.त्यांनी म्हणलं आहे कि, पहलगाम हल्ल्यात टीआरएफचा सहभाग असल्याचे पुरावे दाखवा, आम्ही पुराव्याशिवाय आरोप स्वीकारणार नाही.
संसदेत दिलेल्या निवेदनात इशाक डार म्हणाले की, पाकिस्तान टीआरएफला बेकायदेशीर संघटना मानत नाही आणि भारत किंवा अमेरिकेने टीआरएफच्या सहभागाचे ठोस पुरावे सादर करावेत. पहलगाम हल्ल्यात टीआरएफचा सहभाग असल्याचे पुरावे दाखवा. टीआरएफने जबाबदारी घेतल्याचा दावा सिद्ध करा. आम्ही पुराव्याशिवाय आरोप स्वीकारणार नाही.
टीआरएफ ही पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाची संलग्न संघटना आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली होती. यामध्ये २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. भारतीय आणि अमेरिकन गुप्तचर संस्थांनीही या हल्ल्याचा लष्कर-ए-तैयबा नेटवर्कशी संबंध असल्याची पुष्टी केली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर, या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने स्वतः घेतली आणि एक निवेदन जारी केले की, भारत सरकार काश्मीरमधील मुस्लिमांना बहुसंख्येकडून अल्पसंख्याक बनवत आहे.तथापि, २६ एप्रिल रोजी टीआरएफने आपला दावा मागे घेतला.संघटनेचे प्रवक्ते अहमद खालिद म्हणाले की पहलगाम हल्ल्यासाठी टीआरएफला दोष देणे चुकीचे आहे. खालिद म्हणाले की त्यांची वेबसाइट हॅक करण्यात आली आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
