काठमांडू, 17 ऑगस्ट (हिं.स.)। नेपाळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी रविवारी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची भेट घेऊन त्यांना भारत दौऱ्याचे औपचारिक निमंत्रण दिले.
पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी सकाळी झालेल्या या भेटीत परराष्ट्र सचिव मिस्री यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने भारत दौऱ्याचे निमंत्रणपत्र पंतप्रधान ओली यांना सुपूर्द केले. परस्पर सहमतीनंतर पंतप्रधान ओली यांचा भारत दौरा १६ सप्टेंबरपासून निश्चित करण्यात आला आहे.
या भेटीदरम्यान उपस्थित असलेले पंतप्रधान ओली यांचे प्रमुख राजकीय सल्लागार विष्णु रिमाल यांनी सांगितले की, औपचारिक निमंत्रणपत्र दिल्याबद्दल पंतप्रधान ओली यांनी भारतीय परराष्ट्र सचिवांचे आभार मानले. रिमाल यांच्या मते, जवळपास एक तास चाललेल्या या बैठकीत भारत दौऱ्यावेळी चर्चेला घेण्यात येणाऱ्या प्रमुख मुद्द्यांवरही विचारविनिमय झाला. यावेळी पंतप्रधान ओली यांनी भारत–नेपाळ संबंध अधिक दृढ करण्याचा विश्वास व्यक्त केला.
भारतीय परराष्ट्र सचिव मिस्री यांनी सांगितले की, भारत सरकार पंतप्रधान ओली यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. त्यांच्या या भारत दौर्यामुळे दोन्ही देशांतील परस्पर सहकार्य सर्व क्षेत्रांत वृद्धिंगत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भारत–नेपाळ कनेक्टिव्हिटी वाढविणे आणि दोन्ही देशांच्या जनतेतील नातेसंबंध अधिक दृढ करण्याबाबतही त्यांनी आश्वासन दिले.
या बैठकीस नेपाळातील भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव, भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील नेपाळ डेस्कचे प्रभारी अतिरिक्त सचिव मनु महावर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
