वॉशिंग्टन , 21 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत असून आता तो इतक्या टोकाला पोहोचला आहे की अमेरिकेने व्हेनेझुएलाचा संपूर्ण परकीय व्यापारच ठप्प केला आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे आणखी एक व्यापारी जहाज जप्त केले आहे. याआधीही अमेरिकेने व्हेनेझुएलाचा एक तेलवाहू टँकर जप्त केला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या सरकारवर सातत्याने दबाव वाढवत आहेत.
अमेरिकन अधिकाऱ्यांनी या घडामोडीची माहिती दिली. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाची नाकेबंदी करण्याचा आणि व्हेनेझुएलातून ये-जा करणाऱ्या सर्व तेल टँकरांवर बंदी घालण्याचा जाहीर निर्णय घेतल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या घोषणेनंतर 10 डिसेंबर रोजी अमेरिकन सुरक्षा दलांनी व्हेनेझुएलाच्या किनाऱ्याजवळील त्याचा एक तेल टँकर जप्त केला होता. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, व्यापारी जहाज जप्त करण्याची ही अलीकडील कारवाई परस्पर संमतीने करण्यात आली असून अमेरिकन अधिकाऱ्यांनी जहाजावर चढून ते आपल्या ताब्यात घेतले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना सांगितले आहे की त्यांच्या सत्तेत राहण्याचे आता मोजकेच दिवस उरले आहेत. ट्रम्प यांनी अलीकडेच मागणी केली होती की व्हेनेझुएलाने अनेक वर्षांपूर्वी जप्त केलेली अमेरिकन तेल कंपन्यांची मालमत्ता आता परत करावी. याच कारणामुळे व्हेनेझुएलावर दबाव टाकण्यासाठी ट्रम्प यांनी देशाची नाकेबंदी केली आहे. अमेरिकेची लढाऊ जहाजे आणि युद्धनौका प्रशांत महासागरात तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांनाही अमेरिकेकडून हल्ला होण्याची भीती वाटत आहे.
दरम्यान, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी संयुक्त राष्ट्रांकडे अमेरिकेची नाकेबंदी हटवण्याची विनंती केली आहे. त्याच वेळी संयुक्त राष्ट्रांनीही दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
