काबूल, 27 ऑगस्ट (हिं.स.) : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये बुधवारी (दि.२७) पहाटे एक प्रवासी बस उलटल्याने किमान २५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तालिबानच्या एका अधिकाऱ्याने या अपघाताबाबत माहिती दिली आहे. ही दुर्घटना काबूलच्या अरघंडी परिसरात सकाळी घडली. बस दक्षिण अफगाणिस्तानमधून हेलमंद आणि कंधार येथील प्रवाशांना घेऊन येत होती.
गृह मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल मतीन कानी यांनी सांगितले की, ही दुर्घटना वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे झाली असून, या घटनेत २७ लोक जखमी झाले आहेत. यापूर्वी, अवघ्या एका आठवड्याच्या आत, पश्चिम हेरात प्रांतात सुमारे ८० लोकांचा मृत्यू झाला होता.अफगाणिस्तानमध्ये रस्ते अपघात ही सामान्य बाब आहे. यामागे अनेक दशके चाललेल्या युद्धानंतरच्या खराब रस्त्यांची स्थिती, महामार्गांवर धोकादायक आणि बेफिकीर वाहन चालवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन, जुन्या आणि तांत्रिकदृष्ट्या असुरक्षित बसेस या देखील अपघाताचं मुख्य कारण आहेत.
मे २०१६ मध्ये, अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडील जाबुल प्रांतात कंधार-काबूल महामार्गावर दोन प्रवासी बस आणि एक ट्रक यांच्यात भीषण धडक झाली होती. ही धडक इतकी जोरदार होती की, अपघातानंतर लगेचच वाहनांना आग लागली.या बसांमध्ये महिला, मुले आणि सामान्य प्रवासी होते. आग लागल्यानंतर बहुतांश लोक वाहनाबाहेर पडू शकले नाहीत आणि जिवंत जळून मृत्युमुखी पडले. या भयानक दुर्घटनेत किमान ७३ लोकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण गंभीर जखमी झाले होते.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
