पुणे , 26 नोव्हेंबर (हिं.स.) पुण्याशी माझे खूपच जिव्हाळ्याचं नातं आहे. मी माझं पहिलं व्यावसायिक नाटक टुरटूर १९८३ साली रंगभूमीवर आणलं. मुंबईत त्याच ७ – ८ प्रयोग केले. पण तेथे तिकीट विक्रीचा आकडे कधीही ३०० – ४०० रूपयांच्यावर गेला नाही. अशा परिस्थितीत मी हेच नाटक पुण्यात भरत नाट्यमंदिरयेथे प्रयोग लावला. तो प्रयोग हाऊसफुल्ल झाला. त्यानंतर याच नाटकाचे प्रयोग नाशिकला व त्यानंतर उर्वरीत महाराष्ट्रात हाऊसफुल्ल झाले. त्यानंतर मुंबईत त्याचे प्रयोग असेच झाले. व्यवसायिक रंगभूमीचे दरवाजे पुणेकरांनी माझ्यासाठी उघडले अशा भावना निर्माता, दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे यांनी आज यशवंत – वेणू पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केल्या. दरम्यान, दिग्दर्शनाचेही सुरूवातीचे धडे आपण पुण्यातच माझे गुरू राजदत्तजी यांच्या हाताखाली गिरवले अशी कबुलीही त्यांनी दिली.
देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतीदिन, यशवंराव चव्हाण नाट्यगृहाचा वर्धापन दिन, प्रभाकर पेंढारकर यांचा स्मृती दिन आणि रंगकमी दिनाचे औचित्यसाधून अखिल भारतील मराठी नाट्य परिषदेच्या कोथऱूड शाखेच्यावतीने यंदाचा यशवंत-वेणू पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे आणि अनिता बेर्डे यांना जेष्ठ दिग्दर्शक राजदत्तजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अनिता बेर्डे यांना स्वन्पाली गोखले यांनी साडीचोळी देऊन त्यांचाही सन्मान केला. त्यावेळी बेर्डे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, उद्योजक अमीत गोखले, नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, प्रमुख कार्यवाह सत्यजीत धांडेकर, समीर हंपी आणि खजिनदार प्रदीप गुप्ते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यापूर्वी यशवंत-वेणू पुरस्काराने शि. द. फडणीस, जयंत सावरकर, मोहन जोशी, अशोक हंडे आणि स्वरूपकुमार यांना गौरविण्यात आले आहे. मानपत्र, स्मृतीचिन्हं, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
बेर्डे म्हणाले, पहिला चित्रपट हमाल दे धमाल करण्यापूर्वी दिग्दर्शनाचा अनुभव घेण्यासाठी आपण राजदत्तजी यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केले. त्यांच्या चिमणराव गुंड्याभाऊ या हिंदी मालिकेचे सर्व चित्रिकरण पुण्यातचे झाले. या मालिकेत सहाय्यक म्हणून आपण त्यांच्याकडे दिग्दर्शनाचे धडे गिरवले. तसेच कॉलेजमध्ये असतान दांडी मारून चित्रपट नाटकं न बघता किंवा टाइमपास न करता आपण रेकॉर्डिंग स्टुडिओत लक्ष्मीकांत प्यारेलालजी यांचे रेकॉर्डिंग बघून बघून संगीत दिर्ग्दशनाचे धडे गिरवले.
हिंदुस्थान समाचार
