
मुंबई, 12 जुलै (हिं.स.)। ११ जुलै रोजी प्रदर्शित
झालेल्या अभिनेता राजकुमार राव यांच्या ‘मालिक’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी
प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवला. या चित्रपटात प्रथमच राजकुमारचा गँगस्टर अवतार
पाहायला मिळाला, ज्याला
प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे, विक्रांत मॅसी आणि शनाया कपूर यांच्या ‘आंखों की
गुस्ताखियां’ या चित्रपटालाही त्याच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात आलं,
आणि त्यामुळे दोन्ही चित्रपटांमध्ये थेट टक्कर
पाहायला मिळाली.
‘मालिक’ – बॉक्स ऑफिस रिपोर्ट
बॉक्स ऑफिस ट्रॅकिंग
वेबसाइट सॅकनिल्कच्या माहितीनुसार, ‘मालिक’ने प्रदर्शना दिवशी म्हणजेच पहिल्या दिवशी ३.३५ कोटी रुपयांची कमाई केली
आहे. सध्या अनेक चित्रपट प्रदर्शित असल्यामुळे ही ओपनिंग ठीकठाक मानली जात आहे.
चित्रपटाचा एकूण बजेट सुमारे ५० कोटी रुपये असल्याने या टप्प्यापर्यंत
पोहोचण्यासाठी ‘मालिक’ला अजून मोठा पल्ला गाठावा लागेल. आता प्रेक्षकांची आणि
निर्मात्यांची सर्व आशा वीकेंड कलेक्शनवर आहे.
चित्रपटाची कथा ८० च्या
दशकातील इलाहाबादच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे, ज्यात एक शेतकऱ्याचा मुलगा दीपक (राजकुमार राव) आपल्या
परिस्थितीशी झुंज देत ‘मालिक’ कसा बनतो, हे दाखवण्यात आले आहे. मानुषी छिल्लरसोबत राजकुमारची जोडी पहिल्यांदाच पाहायला
मिळतेय. सौरभ शुक्ला यांची दबंग नेत्याची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत
आहे. दिग्दर्शक पुलकित यांचे दिग्दर्शन कौतुकास्पद ठरत आहे.
‘आंखों की गुस्ताखियां’ –
बॉक्स ऑफिस रिपोर्ट
दुसरीकडे, विक्रांत मॅसी आणि शनाया कपूर यांचा चित्रपट ‘आंखों
की गुस्ताखियां’ने पहिल्याच दिवशी केवळ ३५ लाख रुपयांची कमाई केली आहे, जी अत्यंत कमकुवत ओपनिंग मानली जात आहे. शनाया
कपूर हिचा हा बॉलिवूड डेब्यू असून, या चित्रपटाकडून
निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु ओपनिंग डेवर चित्रपटाने फारसा प्रभाव
टाकलेला दिसत नाही.
जर वीकेंडपर्यंत या
चित्रपटाच्या कमाईत काही विशेष वाढ झाली नाही, तर हे प्रोजेक्ट निर्मात्यांसाठी तोट्याचं ठरू शकतं. आता
शनायाचा डेब्यू पुढे काय कमाल करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
