मुंबई, 12 सप्टेंबर, (हिं.स.)। अभिनेता तेजा सज्जा यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘मिराय’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, रिलीज होताच या अॅक्शन थ्रिलरला प्रेक्षक व समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, चित्रपटासोबतच निर्मात्यांनी त्याच्या सिक्वेलचीही घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, *‘मिराय’*च्या शेवटी निर्मात्यांनी सिक्वेलचे संकेत दिले असून, त्याचे नाव ‘मिराय: जैथरया’ असे ठेवण्यात आले आहे. हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला सिनेमागृहांत दाखल होणार आहे. या दुसऱ्या भागात अभिनेता राणा दग्गुबाती दमदार खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांची झलकदेखील मेकर्सनी प्रेक्षकांना दाखवली आहे. एका मुलाखतीत त्यांनी उघड केले होते की या सिक्वेलची स्क्रिप्ट तयार झाली असून, सुमारे २० टक्के शूटिंग आधीच पूर्ण झाले आहे.
‘मिराय’ या चित्रपटात तेजा सज्जा यांच्यासोबत मांचू मनोज, रितिका नायक, श्रिया सरन, जयराम, जगपति बाबू, राजेंद्रनाथ जुत्शी, पवन चोप्रा आणि तनजा केलर यांसारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. हा एक पॅन-इंडिया चित्रपट असून, हिंदीसह तमिळ आणि तेलुगूमध्येही प्रदर्शित झाला आहे. हिंदी पट्ट्यातील प्रदर्शनाची जबाबदारी करण जोहर यांच्या धर्मा प्रॉडक्शन्सने सांभाळली असून, त्यामुळे चित्रपटाला अधिक स्क्रीन आणि व्यापक प्रेक्षकवर्ग मिळण्याची अपेक्षा आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
