रत्नागिरी, 9 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी तालुक्यात पिढ्यानपिढ्या नमन लोककला अविरतपणे जपणाऱ्या नमन मंडळांच्या कलाकारांना सोबत घेत कोकण नमन कला मंचातर्फे ‘महानमन’ निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी मराठी रंगभूमी दिनानिमित्ताने तालुक्यातील नमन मंडळांच्या सहकार्याने कलावंतांना एकत्रित आणून नमन लोककला जगासमोर अधिक वृद्धिंगत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
कोकण नमन कला मंच या संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर (पीटी) कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य आणि कलावंत यांच्यासमवेत गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात विचारविनिमय सुरू होता. त्यासंदर्भात विशेष बैठकही घेण्यात आली. या विषयावर चर्चा करून महानमन कार्यक्रमासाठी सर्वांनी पाठिंबा व सहकार्य दर्शवले.
तालुका स्तरावरील ‘महानमन’ कार्यक्रमाच्या तालमीचा प्रारंभ हातखंबा येथे सिद्धिगिरी मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात झाला. कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष श्रीधर खापरे, ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश होरंबे, वसंत साळवी, विश्वनाथ गावडे, संतोष धनावडे, सुरेश येजरे, चंद्रकांत पड्ये, श्रीकांत बोंबले उपस्थित होते. तालुकाभरातील विविध नमन मंडळांतील कलावंतही यावेळी आवर्जून आले होते.
या कार्यक्रमाद्वारे नमन कलावंतांना ‘अ’ दर्जाची पेन्शन योजना मिळवून देण्याचाही संस्थेचा मानस आहे.
हिंदुस्थान समाचार
