
मुंबई, 22 सप्टेंबर (हिं.स.)। मराठी टेलिव्हिजनवरील प्रतिष्ठित असा पुरस्कार सोहळा ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ – सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा! याच्या नामांकन सोहळ्याचे नेहेमीप्रमाणेच भव्य आयोजन करण्यात आले होते. यावर्षीच्या या विशेष कार्यक्रमाची “ द टाईमलेस गाला” ही थीम होती. ज्यामध्ये झी मराठीवरील विविध मालिकांतील कलाकारांनी आपल्या मोहक आणि आकर्षक वेशभूषेत हजेरी लावून कार्यक्रमात रंग भरले.
या नामांकन सोहळ्याचे औचित्य आणखी खास होते, कारण यावर्षी झी मराठीने आपल्या यशस्वी प्रवासाची २६ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे ही केवळ एक नामांकन पार्टी नव्हती, तर एक डबल सेलिब्रेशन होत झी मराठीचा प्रवासाचा आणि येणाऱ्या अवॉर्ड्सचा उत्साहाचं. हा प्रसंग म्हणजे झी मराठी परिवाराचा एकत्रितपणे साजरा केलेला सोहळा होता, जिथे सर्व कलाकार एका छताखाली जमून आजवरच्या वाटचालीचा आनंद घेत होते.
कार्यक्रमादरम्यान जसजशी विविध श्रेणीतील नामांकने उघड केली जात होती, तसतशी उपस्थित कलाकारांची उत्सुकता आणि टाळ्यांचा कडकडाट अधिकच वाढत होता. विशेष बाब म्हणजे, प्रत्येक कलाकार केवळ आपल्या मालिकेसाठी नव्हे तर इतर मालिकांच्या कलाकारांनाही तितक्याच मनापासून शुभेच्छा देत होते. ही स्नेहभावना आणि सन्मान झी मराठीच्या संस्कृतीचं खरं दर्शन घडवत होती. नामांकनांची घोषणा पूर्ण झाल्यानंतर कलाकारांनी त्यांच्या देखण्या पेहरावात रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. टॅक्सिडो, गाऊन्स आणि आकर्षक अदा यामधून झी मराठीच्या स्क्रीनवरील परिचित चेहरे एक वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर आले. हा नामांकन सोहळा जितका उत्सवमय होता, तितकीच आता उत्कंठा लागून राहिली आहे ती मुख्य पुरस्कार सोहळ्याची.
‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ हा अविस्मरणीय सोहळा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. तर हे सगळं अनुभवण्यासाठी आणि तुमच्या लाडक्या कलाकारांचा सन्मान पाहण्यासाठी सदैव तुमच्या झी मराठीशी सतत जोडलेले राहा.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
