मुंबई, 11 सप्टेंबर, (हिं.स.)। भारतीय सिनेमाच्या इतिहासात आपली वेगळी छाप सोडणाऱ्या ‘रंगीला’ चित्रपटाला यंदा ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली ८ सप्टेंबर १९९५ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट रिलीज होताच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागला होता.
आमिर खान, उर्मिला मातोंडकर आणि जॅकी श्रॉफ यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट त्या काळात बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता आणि आजही हिंदी सिनेमातील क्लासिक चित्रपटांच्या यादीत त्याचं नाव घेतलं जातं.
‘रंगीला’ ने फक्त त्या काळातील चित्रपटनिर्मितीच्या शैलीला नवा आयाम दिला नाही, तर भारतीय प्रेक्षकांना एक ताजातवाना आणि वेगळा सिनेमॅटिक अनुभव दिला. आमिर खानचा खट्याळ आणि सहज वावर, उर्मिला मातोंडकरची मोहक आणि निरागस अदाकारी, तसेच जॅकी श्रॉफची गंभीर पण संवेदनशील भूमिका – या तिघांच्या अभिनयाने चित्रपटाला वेगळीच उंची मिळाली.
आता तब्बल तीन दशकांनंतर प्रेक्षकांना पुन्हा एकदा ‘रंगीला’ मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून ही माहिती देत “रंगीला 4K डॉल्बीमध्ये पुन्हा रिलीज होत आहे असे सांगितले. आमिर खान, जॅकी श्रॉफ, उर्मिला मातोंडकर आणि ए.आर. रहमान यांना यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा. रंग पुन्हा परत येत आहेत.” असा संदेश देत पोस्टर शेअर केला.
या घोषणेमुळे प्रेक्षकांमध्ये जुन्या आठवणी ताज्या झाल्या असून, ९०च्या दशकात ज्याप्रमाणे ‘रंगीला’ने तरुणाईला वेड लावलं होतं, तसाच अनुभव आता नव्या तंत्रज्ञानासह – 4K आणि डॉल्बी ऑडिओ क्वालिटीमध्ये मिळणार आहे.
‘रंगीला’च्या चर्चेत त्याच्या संगीताचा उल्लेख करणं अत्यावश्यक आहे. ए.आर. रहमान यांनी दिलेलं संगीत आजही तितकंच ताजं आणि लोकप्रिय आहे. या चित्रपटातील गाण्यांनी त्या काळात चार्टबस्टरचा दर्जा मिळवला होता आणि रहमान यांना हिंदी चित्रपटसृष्टीत नवी ओळख दिली होती.
कमाईच्या दृष्टीनेही ‘रंगीला’नं इतिहास घडवला होता. अवघ्या ८ कोटींच्या बजेटवर तयार झालेल्या या चित्रपटानं तब्बल ३३.४५ कोटींचा गल्ला जमवला आणि त्या काळातील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला. आजही हा चित्रपट प्रेक्षक पुन्हा पुन्हा पाहतात.
तर आता पुन्हा एकदा ‘रंगीला’चा रंगतदार जादू सिनेमागृहांत अनुभवायला सज्ज व्हा!
—————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
