मुंबई, 6 ऑगस्ट, (हिं.स.)। ‘भूल भुलैया 3’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन आता एका नव्या आणि रोमांचक चित्रपटासाठी तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कार्तिक सध्या तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी यांच्यासोबत त्यांच्या आगामी हिंदी चित्रपटासाठी चर्चेत आहेत.
‘रंगून’ आणि ‘अमरन’ यांसारख्या चित्रपटांमुळे ओळख निर्माण केलेले पेरियासामी आता हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असून, त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी कार्तिक आर्यन आणि अभिनेते अक्षय खन्ना यांना घेण्याची त्यांची योजना आहे. दोघेही कलाकार या संकल्पनेबद्दल उत्साहित असून, अद्याप कोणताही अधिकृत करार झालेला नाही.
हाती आलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा मानस निर्मात्यांचा आहे. चित्रपटाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल, अशीही माहिती मिळत आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
