मुंबई , 15 डिसेंबर (हिं.स.)।कॉमेडी किंग म्हणून ओळखले जाणारे कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय कॉमेडी शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ च्या नव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा नवा सीझन 20 डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर सुरू होणार आहे. शोच्या शूटिंगबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होत्या, मात्र आता शोचा पहिला पाहुणा कोण असणार हेही स्पष्ट झाले आहे.
आज नेटफ्लिक्सने इंस्टाग्रामवर शोसंदर्भात एक पोस्ट शेअर केली असून, त्यात “द ग्रेट इंडियन कपिल शो” चा नवा सीझन 20 डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच ओटीटी प्लॅटफॉर्मने हेही उघड केले आहे की, शोच्या पहिल्या भागाची खास पाहुणी दुसरी कोणी नसून ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा असणार आहे.
कपिल शर्मा आणि प्रियंका चोप्रा यांचा एक पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे, “जेव्हा देसी गर्ल येते, तेव्हा वातावरण अधिकच मजेदार होतं. प्रियंका चोप्रा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नव्या सीझनच्या प्रीमियर एपिसोडमध्ये सहभागी होणार आहेत. पाहा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ 20 डिसेंबरपासून फक्त नेटफ्लिक्सवर.” या वेळी शोमध्ये काहीतरी वेगळे पाहायला मिळणार आहे, कारण यंदा शोला मल्टिव्हर्सशी जोडण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
कपिल शर्माच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, अलीकडेच त्यांचा चित्रपट ‘किस किसको प्यार करूं 2’ चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, प्रियंका चोप्रा सध्या दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या आगामी चित्रपट ‘वाराणसी’मुळे चर्चेत आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
