मुंबई, 19 जानेवारी, (हिं.स.) या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 14 या अत्यंत लोकप्रिय गायन रियालिटी शो मध्ये ‘देव आनंद आणि झीनत अमान’ विशेष भाग अभिनेत्री झीनत अमानच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. बॉलीवूडमधील सदाबहार व्यक्तिमत्व देव आनंदला आदरांजली वाहताना झीनत अमानने देव आनंदच्या चित्रपट करकीर्दीविषयी प्रशंसोद्गार काढले आणि त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या भागात कुमार सानू आणि हुसैन कुवाजेरवाला हे दोघे आपापल्या परीने झीनत अमानला प्रभावित करण्याचा प्रयत्न करताना दिसतील, ज्यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होईल.
या विशेष भागात फरीदाबादची आद्या मिश्रा 1971 मधील ‘हरे राम हरे कृष्ण’ चित्रपटातील ‘दम मारो दम’ हे अजरामर गाणे सादर करून बाजी मारताना दिसेल. तिचे तोंड भरून कौतुक करताना झीनत अमान उद्गारली, “अशी प्रतिभावान व्यक्ती जर बॉलीवूडमध्ये आली, तर नक्कीच खळबळ माजवेल!”
झीनत अमान देव आनंदविषयी बोलताना चित्रपट निर्मितीच्या त्याच्या आगळ्यावेगळ्या दृष्टिकोनाविषयी सांगेल. बॉलीवूडच्या सुवर्णकाळाची याद ताजी करणारा हा भाग प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवून जाईल, यात शंकाच नाही. त्यामुळे, हा भाग अवश्य बघण्यासारखा असेल.
बघायला विसरू नका, इंडियन आयडॉल 14 या शनिवारी रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!
हिंदुस्थान समाचार
