सोलापूर 1 डिसेंबर ( हिं.स) नेहमीच गजबलेल्या असणाऱ्या शहरातील सराफ दुकानातून दिवसाढवळ्या दागिने पाहण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघा चोरट्यांनी सोन्याच्या चार बांगड्या चोरल्या होत्या. हे आरोपी कर्नाटकात असल्याचा सुगावा लागताच गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकातील बीदर येथे जाऊन पकडले.त्याच्याकडून ४०. ४५० ग्रॅम वजनाचा २ लाख ३२ हजार रुपयांचा मद्देमाल जप्त करण्यातर आला. त्यांच्या अन्य एका साथीदाराचा शोध सुरु आहे.
सराफ गल्ली झालेल्या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व सहकाऱ्यांनी अशा स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या आरोपींच्या गुन्हे कार्यप्रणालीचा अभ्यास करताना खबऱ्याकडून संबंधित आरोपी कर्नाटकातील बीदर येथे असल्याचे समजले. त्यानंतर पथकातील सपोनि जीवन निरगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्नाटकातील बीदर येथे जाऊन तेथील पोलिसांच्या मदतीने इराणी गल्लीत जहिद उर्फ हैदरअली उर्फ काला कौवा जावेदअली इराणी याला चिद्री बीदर रोड येथून ताब्यात घेतले.
हिंदुस्थान समाचार
