मुंबई, 1 डिसेंबर (हिं.स.) : श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर व पालखीतळ मार्ग विकास आराखडा अंतर्गत मौजे सुदुंबरे, ता.मावळ, जिल्हा पुणे येथील श्री संत जगनाडे महाराज यांच्या समाधीचा विकास व सौंदर्यीकरण आराखड्यास मान्यता मिळाली असून यासाठी 66.118 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
श्री संत जगनाडे महाराज यांच्या समाधीचा विकास व्हावा यासाठी निधी देण्याची मागणी श्री. वडेट्टीवार यांनी मार्च 2022 मध्ये केली होती. त्यानंतर केलेल्या पाठपुराव्यामुळे सरकारने याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला असून 66.118 कोटी इतका निधी मंजूर केला आहे. श्री संत जगनाडे महाराजांच्या विचारांचा, कार्याचा प्रचार, प्रसार होण्यासाठी समाधी स्थळाचा विकास होणे महत्वाचे होते.
यासंदर्भात श्री. वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, श्री संत जगनाडे महाराज यांचे विचार आणि साहित्य हे प्रेरणादायी आहे. संतांनी कधीही कोणत्या एका समाजासाठी काम केले नाही. संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकतेचा संदेश देत सर्व समाजासाठी कार्य केले. आज समाजात घडत असलेल्या अनुचित घटना लक्षात घेता समाजाला खऱ्या अर्थाने संत विचारांची गरज आहे. संत तुकाराम महाराजांची गाथा कर्मठ लोकांनी बुडविली तेंव्हा श्री संत जगनाडे महाराजांनी तिचे संकलन आणि पुनर्लेखन केले होते. त्यांनी स्वतः अनेक अभंग लिहून समाजाला शहाणे केले. त्यांचे हे समाधी स्थळ सर्वांसाठी प्रेरणास्रोत म्हणून ओळखले जाईल. त्यांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. आता या समाधी स्थळाचा दर्जेदार विकास व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हिंदुस्थान समाचार
