भंडारा, 19 सप्टेंबर, (हिं.स.)। दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने तुमसर शहरात सुरू असलेल्या एका मोठ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून,त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई भंडारा येथील दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने केली आहे. दहशतवाद विरोधी शाखेला एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
तुमसर येथील वैभव बोरकर (४०, रा. आंबेडकर वार्ड, तुमसर जि. भंडारा) आणि भारत कोल्हाडकर (३६, रा. शिवाजी वार्ड, तुमसर जि. भंडारा) हे दोघे मिळून मेहेगाव येथे बांधकाम सुरू असलेल्या घरामध्ये वेश्याव्यवसायाचा अड्डा चालवत होते. हे दोघे आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना या व्यवसायात ढकलत होते. माहितीची खात्री पटल्यानंतर, तुमसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मयंक माधव यांच्या आदेशानुसार ही कारवाईची योजना आखण्यात आली. या कारवाईसाठी गोबरवाही पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद शेवाळे यांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. पथकाने बनावट ग्राहक पाठवून या माहितीची पडताळणी केली.
बनावट ग्राहकाने दिलेल्या माहितीनुसार,आरोपी वैभव बोरकर आणि भारत कोल्हाडकर हे दोघे महिला पुरवत होते आणि ग्राहकांकडून पैसे घेत होते. पुराव्यांची खात्री झाल्यानंतर,पोलिस पथकाने पंचांसमक्ष त्या घरात छापा टाकला. छाप्यात पोलिसांनी वेश्याव्यवसायासाठी वापरले जाणारे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली. तसेच,या अड्ड्यामध्ये सापडलेल्या एका महिलेची सुटका करण्यात आली. त्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती भारत कोल्हाडकर याच्या सांगण्यावरून येथे येत होती आणि ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांतील काही भाग त्याला देत होती. या कारवाईनंतर आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर कलम ३, ४, ५, अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar
