अमरावती, 3 सप्टेंबर (हिं.स.) : तिवसा तालुक्यातील अशोकनगर परिसरात एका थरारक हत्येची घटना आज सकाळी घडली. मागील वर्षी शेजाऱ्याच्या वडिलांची हत्या करणाऱ्या अमोल वसंत डाखोरे (वय ४०) याचा आज सकाळी चाकूने भोसकून खून करण्यात आला. विशेष म्हणजे ही हत्या त्याच्या आईसमोरच घडली, आणि आरोपीने अमोलच्या आईलाही चाकूने वार केलेत. सध्या त्या महिलांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुमारे वर्षभरापूर्वी अमोल डाखोरेने शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीचा खून केला होता. त्या गुन्ह्यातून तो अलीकडेच, ८-१० दिवसांपूर्वी जेलमधून सुटून घरी परतला होता. याच घटनेचा बदला घेण्यासाठी शेजाऱ्याच्या मुलाने आज सकाळी अमोलवर चाकूने हल्ला केला. अमोलच्या घरात मागील दोन दिवसांपासून महालक्ष्मीच्या पूजेचा कार्यक्रम सुरु होता. आज सकाळी आरोपी चाकू घेऊन त्यांच्या घरात शिरला. घरातच काही धक्काबुक्की झाली आणि नंतर दोघे घराबाहेर आले. तेथे पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. भांडणात आरोपीने अमोलवर सपासप वार केले. त्याला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या आईलाही चाकूचे घाव लागले. घटनेनंतर अमोलच्या आईला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण आईचा रुग्णालयात दुर्देवी मृत्यू झाला. या थरारक घटनेमुळे अशोकनगरसह संपूर्ण तिवसा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोर आरोपी अद्याप फरार असून तिवसा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही हत्या अमोलच्या शेजारी राहत असलेल्या अवझाड कुटुंबाच्या मुलाने केल्याचे सांगितले जात आहे. तिवसा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीस पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत तपास वेगाने सुरू केला आहे. ही हत्या फक्त कौटुंबिक वैमनस्य नाही, तर समाजमनाला हादरवणारी आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी
