पुणे, 6 ऑगस्ट, (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १३ संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. जुलै २०२५ महिन्यात विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या १३ गंभीर गुन्ह्यांमध्ये एकूण ५७ गुन्हेगारांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.या टोळ्यांनी खून, खुनाचा प्रयत्न, अमली पदार्थविक्री, जबरी चोरी, खंडणी, अपहरण, बलात्कार, घातक शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे, फसवणूक, बनावट कागदपत्रे वापरणे, घरफोडी, दरोडे, वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणे, वाहनांची तोडफोड-जाळपोळ यांसारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर एकूण ११४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अंतर्गत मोकाची कारवाई केली आहे. हिंजवडी, चिंचवड, चिखली, देहूरोड, बावधन, चाकण, सांगवी, दिघी, संत तुकारामनगर, म्हाळुंगे एमआयडीसी, एमआयडीसी भोसरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या १३ टोळीप्रमुख व त्यांचे ५७ साथीदार यांच्यावर ओळख पटवून तपासाअंती ‘मकोका’अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
