येवला, 26 ऑक्टोबर (हिं.स.) येवला तालुक्यातील नगरसुल येथील कमोदकर वस्ती व शुक्ला वस्ती या ठिकाणी गेल्या आठवड्यात दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत जबरी लूट केली होती. तसेच सात ते आठ नागरिकांना गंभीर जखमी केले होते. दरोडाच्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. या दरोडा प्रकरणात आत्तापर्यंत एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून येवला तालुका पोलिसांना या दरोडेखोरांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना केल्या होत्या.त्यानुसार येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाचे पुरावे तांत्रिक विश्लेषण व श्वान पथकाची मदत अशी एकत्रित माहिती अभ्यासून घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या मळुबाई घाट येथून लखन जनार्धन पवार, राजू उर्फ (राजेंद्र दत्तू माळी), ज्ञानेश्वर त्रंबक मोरे, त्र्यंबकेश्वर मोरे, गणेश वसंत माळी, शरद सुभाष माळी अशा सहा जणांना अटक केली.यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखवत त्यांनी त्यांचे इतर साथीदार संजू दादा पवार (रा. नगरसुल), नामदेव नाथा गायकवाड (रा. पांजरवाडी तालुका येवला) आणि सोनू नानासाहेब गांगुर्डे (रा. धामोरी तालुका कोपरगाव ) अशा आणखी तीन जणांना अटक केली. या दरोडा प्रकरणात आत्तापर्यंत एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दि. 30 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हिंदुस्थान समाचार
