नाशिक, २६ ऑक्टोबर, (हिं.स) – क्षमतेपेक्षा अधिक व अवैधरित्या मुरूम वाहतूक करणारा डंपर आरटीओने दंडात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतला असता तो डंपर कोणाचीही परवानगी न घेता चोरुन नेणाऱ्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी नितीन गंगाराम उके (वय ४५, रा. शैजल दौलत अपार्टमेंट, कलानगर, दिंडोरीरोड, नाशिक) हे आरटीओ कार्यालयात इन्पेक्टर आहे. त्यांनी
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी रोशन पांडुरंग ढगे (रा. रासेगाव, ता. दिंडोरी) हे एम.एच.१५ एचवाय ९५९६ या क्रमांकाच्या डंपरचे मालक असून, ते क्षमतेपेक्षा अधिक मुरुम भरून वाहतूक करीत होते. दि. २५ ऑक्टोबर रोजी फिर्यादी उके यांनी डंपर चालकाविरुद्ध कारवाई करुन हा डंपर आरटीओ कार्यालयाजवळ असलेल्या एस.टी. डेपोजवळ उभा केलेला होता. आरोपी रोशन ढगे याने शासकीय दंड बुडवण्याच्या उद्देशाने फिर्यादी उके यांच्या कायदेशीर रखवालीतून हा डंपर चोरुन नेला. तसेच याबाबत विचारणा केली असता आरोपी ढगे याने डंपर वाहन पेटवून देण्याची धमकी देऊन शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले. तसेच शासकीय अधिकाऱ्यांना दमबाजी करुन शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात डंपर मालक रोशन ढगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार रानडे करीत आहे.
हिंदुस्थान समाचार
