आरोपींमद्ये पोलिसासह नागपुरातील पत्रकाराचा समावेश
नागपूर, 29 जानेवारी (हिं.स.) : ‘हनी ट्रॅप’च्या माध्यमातून एका शासकीय अभियंत्याला ब्लॅकमेल करणाऱ्या नागपुरातील टोळीला आज, सोमवारी गडचिरोली पोलिसांनी अटक केली. आरोपींमध्ये नागपुरातील एका न्यूज पोर्टलचा पत्रकार रविकांत कांबळे आणि पोलिसांचा देखील समावेश आहे.
यासंदर्भात पिडीत अभियंत्याने दिलेल्या तक्रारी नुसार 3 जानेवारी 2024 रोजी ते शासकीय कामाने नागपूर येथे गेले असता, यातील आरोपी व फिर्यादीचा जुना मित्र पोलीस कर्मचारी सुशील गवई याने हिंगणा, नागपूर येथील हॉटेलमध्ये त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करुन दिली. फिर्यादी तसेच 2 महिला आरोपी रुममध्ये थांबले असता, महिला आरोपीने फिर्यादीवर बलात्काराचा खोटा आरोप लावून त्यांच्याकडून पैशाची मागणी केली. सर्व आरोपीतांनी संगनमताने फिर्यादीवर बलात्कार केल्याचा व त्यामुळे महिला आरोपी गरोदर राहिल्याचा खोटा आरोप लावला. बलात्काराचा गुन्हा दाखल करुन फिर्यादीची जनमानसात बदनामी करण्याची भिती घालून हे प्रकरण मिटविण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली असा तोंडी रिपोर्ट दिला. त्यावरून भादंवि कलम 384, 389, 120 (ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नागपूर येथे पाठवण्यात आले. गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर शहर गुन्हे शाखा पथकाच्या मदतीने आरोपी सुशील गवई, रवीकांत कांबळे, रोहित अहिर, ईशानी यांना ताब्यात घेऊन गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणातील एक महिला आरोपी फरार असून तिचा शोध घेणे सुरु आहे.
