सोलापूर 17 डिसेंबर ( हिं.स) :राज्य उत्पादन शुल्कच्या माळशिरस विभागाच्या पथकाने मंगळवेढ्यातील दोन ढाब्यांवर टाकलेल्या छाप्यातील दोन हॉटेल चालकांसह नऊ मद्यपी ग्राहकांना न्यायालयाने ५४ हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावला. तसेच मंगळवेढा-मरवडे रस्त्यावर एका चारचाकी वाहनातून विदेशी दारुच्या वाहतुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक संदिप कदम यांनी मंगळवेढ्याच्या हद्दीतील हॉटेल जयभवानीवर छापा टाकला असता ढाबा मालक कुमार सावंत हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था करुन देत असताना आढळून आल्याने त्याच्यासह पाच मद्यपी ग्राहक समाधान खवणकर, आप्पा जाधव, सोमनाथ जाधव, आप्पा मोरे व सुनिल वर्मा यांच्यावर कारवाई करण्यात आली. एका अन्य कारवाईत सांगोल्याचे दुय्यम निरीक्षक कैलास छत्रे यांच्या पथकाने मंगळवेढा हद्दीतील होटेल भैरवनाथ येथे छापा टाकून हॉटेल मालक शुभम जोध व मद्यपी ग्राहक अनिल जाधव, दीपक जाधव, दीपक लोंढे व महेश बोरकडे यांच्यावर कारवाई केली.
हिंदुस्थान समाचार
