नाशिक, 26 जानेवारी (हिं.स.)रिक्षाचालकाने हप्ता दिला नाही म्हणून सोसायटीत उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अनिल बरकत पाटील (रा. लक्ष्मीनारायण अपार्टमेंट, खंडेरावनगर, पाथर्डी फाटा) यांची रिक्षा आरोपी अनोळखी तीन ते चार इसमांनी अडवली. रिक्षा अडवून तू मला रिक्षा चालविल्याचा
हप्ता दे, असे म्हणाले. फिर्यादीने हप्ता देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून टोळक्याने त्यांना शिवीगाळ करून तुझ्याकडे पाहून घेतो, असा दम दिला. त्यानंतर आरोपीने त्यांच्या हातातील काही वस्तूने फिर्यादीच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी असलेली एमएच १५ जेए १८५२ या क्रमांकाची रिक्षा व साक्षीदाराची एमएच १५ जेक्यू ९८३९ या क्रमांकाच्या गाड्यांची तोडफोड करून बिल्डिंगमध्ये दहशत निर्माण केली.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तीन ते चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार देवरे करीत आहेत
—————
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV
