मोबाईलच्या माध्यमातून मिळवून दिली निर्जनस्थळी मदत
नागपूर, 05 ऑक्टोबर (हिं.स.) : कुऱ्हाडीच्या धाकावर एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर अत्याचाराची घटना गुरुवारी नागपुरात घडली. घटनेच्या वेळी पिडीता बहिणीशी फोनवर बोलत होती. त्यामुळे बहिणीने तत्काळ तिच्या कॉलेजमध्ये फोन करून तिला मदत मिळवून दिली. सदर आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
वर्धा मार्गावरील एका महाविद्यालयात शिकणारी विद्यार्थिनी गुरुवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास परगावाहून नागपूरला पोहचली. सकाळची वेळ असल्यामुळे पिडीत तरुणी पायवाटेने कॉलेजला जात होती. यावेळी ती आपल्या बहिणीशी फोनवर बोलत होती. तितक्यात एक इसम तिथे कुऱ्हाड घेऊन आला आणि त्या विद्यार्थीनीला कुऱ्हाडीचा धाक दाखवून फरफटत नेले. पिडतेच्या बहिणीने तिच्या कुटुंबियांना आणि महाविद्यालयाला फोन करून सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर महाविद्यालयाचे सुरक्षारक्षक तत्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांना पाहताच आरोपी फरार झाला. याप्रकरणी हिंगणा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी तिला आधी खासगी हॉस्पीटलमध्ये आणि नंतर शासकीय रुग्णालयात नेले.
भरदिवसा असा प्रकार घडल्याने पोलिस अधिकारीदेखील हादरले. पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी पोहोचले. गुरुवारी दिवसभर परिसरात आरोपीचा शोध घेण्यात आला. मात्र रात्रीपर्यंत आरोपी सापडला नव्हता. सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्यावर वैद्यकीय तपासणी व इतर प्रक्रियानंतर अडीच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित प्रकारात संभोग झाला नसला तरी कायद्यातील तरतुदींनुसार आरोपीवर भादंविचे कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार
