महावितरणने केला 10.60 लाखंचा दंड वसुल
नागपूर, 10 जानेवारी (हिं.स.) : नागपुरात महावितरणने 7 औद्योगिक ग्राहकांकडील सुमारे 52 लाख 55 हजाराची वीजचोरी उघडकीस आली आहे. महावितरणचे भरारी पथक आणि लष्करीबाग उपविभाग यांनी संयुक्तपणे राबवलेल्या अभियानात 7 पैकी 4 ग्राहकांनी वीजचोरीच्या 18 लाख 25 हजार 999 आणि तडजोडीपोटी 10 लाख 60 हजार दंडाच्या रकमेचा भरणा देखील केला.
या संयुक्त मोहीमेत नारी आणि कामठी रोड परिसरातील 7 ग्राहकांकडील तब्बल 3 लाख 14 हजार 753 युनिटची वीजचोरी उघडकीस आली. ही चोरी सुमारे 52 लाख 55 हजार 140 रुपये असून या सातही ग्राहकांविरोधात भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सातपैकी सहा प्रकरणांत दुस-या ग्राहकाकडील इनकमिंग केबलला टॅप करुन मीटर बायपास करण्यात आला होता तर एका ठिकाणी रिमोटच्या सहाय्याने वीजचोती होत असल्याचे निदर्शनास आले. या सातही वीज ग्राहकांना वीज चोरीपोटी 52 लाख 55 हजार 140 रुपये अधिक तडजोडीपोटी 20 लाख 90 हजाराच्या दंडाची आकारणी करण्यात आली यापैकी चार ग्राहकांनी वीजचोरीसाठी 18 लाख 25 हजार 999 आणि तडजोडीपोटी 10 लाख 60 हजार दंडाच्या रकमेचा भरणा देखील केला.
महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे, उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) सुनील थापेकर, कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे यांच्या मार्गदर्शनात अतिरीक्त कार्यकारी अभियंता सर्वश्री हेमेंद्र गौर, श्रीकांत तळेगावकर आणि विवेक राऊत आणि त्यांच्या सहका-यांनी यशस्वीपणे पार पाडली.
हिंदुस्थान समाचार
