पुणे 12 डिसेंबर (हिं.स) इंदापूर येथील दूध दरासाठीच्या आंदोलनात विनापरवाना रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी पाच जणांसह अज्ञात बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई गिरीश गणपत नेवसे (वय ३२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसारपारस दिलीप लाकडे (रा. बारामती), अमरसिंह नरसिंहराव कदम (रा. हिंगणेवाडी, ता. इंदापूर), सीताराम काटे (रा. सराटी, ता. इंदापूर), निखिल मगर (रा. इंदापूर), बंडू जाधव (रा. बाभूळगाव, ता. इंदापूर) यांच्यासह इतर दहा ते बारा जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून कोणतेही प्रकारची परवानगी न घेता जोपर्यंत दूध दरवाढ होत नाही, तोपर्यंत रस्ता रोको करणार, अशी घोषणा देऊन सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची अडवणूक करून रास्ता रोको आंदोलन केले. आरोपींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यावरून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक अपर्णा जाधव करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
