ठाणे, २३ डिसेंबर (हिं.स.) : येथील नौपाडा भागातील ‘शमा फॅमिली ब्युटी सलोन अँड स्पा’ ब्युटी पार्लरवर धाड टाकून दोन महिलांची सुटका केली असून स्पा मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या नौपाडा भागात ‘शमा फॅमिली ब्युटी सलोन अँड स्पा’ या नावाने चालणाऱ्या व्यवसायाच्या आड वेश्याव्यवसाय केला जात असल्याची तक्रार नौपाडा पोलिसांना मिळाली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी एक बोगस गिऱ्हाईक पाठवले. पोलिसांच्या या माणसाने आत जाऊन तेथील मॅनेजरकडे मुलीची मागणी केली. त्याला तिथे बसवून स्पा मॅनेजरने त्याच्यासमोर दोन मुलींना उभं केलं आणि त्यातील एका मुलीला निवडण्यास सांगितले. अशा प्रकारे येथील अवैध वेश्याव्यवसायाचा भांडाफोड केला. यावेळी स्पा मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले व दोन महिलांची सुटका देखील करण्यात आली.
याबाबत भाजपाचे आमदार संजय केळकर यांना विचारले असता, ठाणे हे सांस्कृतिक शहर असून आपण नेहमीच अनधिकृत मसाज पार्लर, स्पा, हुक्का पार्लर व इतर धंद्याबद्दल आवाज उठवल्याचे सांगितले. अशा प्रकारचे कोणतेही अनधिकृत व्यवसाय सुरू असतील, तर पोलिसांनी त्या विरोधात तातडीने कठोर पावले उचलावीत, कारवाई करावी.
हिंदुस्थान समाचार
