मुंबई, 30 जुलै (हिं.स.)। रिलायन्स जिओने काल २९ जुलै रोजी भारतीय बाजारपेठेत त्यांचा नवा जिओपीसी लाँच केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा भारतातील पहिला एआय -रेडी क्लाउड-आधारित व्हर्च्युअल डेस्कटॉप प्लॅटफॉर्म आहे, जो कोणत्याही टीव्ही किंवा स्क्रीनला हाय-एंड संगणकात बदलू शकतो.
या सेवेसाठी महागडा डेस्कटॉप किंवा लॅपटॉप खरेदी करण्याची आवश्यकता नाही. फक्त जिओ सेट-टॉप बॉक्स, कीबोर्ड आणि माउस वापरून वापरकर्ते ही सुविधा सुरू करू शकतात. जिओपीसी सेवा दरमहा ५९९रुपये प्लस जीएसटी तर वार्षिक प्लॅन ४,५९९ रुपये प्लस जीएसटी इतक्या किमतीत उपलब्ध आहे. नवीन वापरकर्त्यांना पहिला महिना मोफत मिळणार आहे.
जिओपीसी कसे काम करते?
जिओपीसी हे जिओ फायबर आणि जिओ एअर फायबर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असून, त्यासाठी जिओ सेट-टॉप बॉक्समध्ये जिओपीसी अॅप डाउनलोड करून जिओ नंबरने लॉगिन करावे लागते. एकदा लॉगिन झाल्यावर क्लाउड-आधारित संगणक तयार होतो आणि तो टीव्ही किंवा कोणत्याही स्क्रीनवर वापरता येतो. क्लाउडवर चालत असल्यामुळे या प्लॅटफॉर्मवर लॅग जाणवत नाही, ते व्हायरस किंवा हॅकिंगपासून सुरक्षित आहे आणि हार्डवेअर अपग्रेड किंवा देखभालीचा त्रासही नाही. सर्व डेटा व प्रक्रिया जिओच्या सुपरफास्ट सर्व्हरवर होतात.
प्रमुख वैशिष्ट्ये:
एआय-रेडी टूल्स: एआय-आधारित अॅप्स आणि टूल्स वापरण्यास सज्ज.
अॅडोब एक्सप्रेस मोफत: व्यावसायिक ग्राफिक्स, व्हिडिओ व फोटो एडिटिंगसाठी.
५१२ जीबी क्लाउड स्टोरेज: फोटो, व्हिडिओ व फाइल्स सुरक्षित ठेवण्यासाठी.
मायक्रोसॉफ्ट ऑफिस व जिओ वर्कस्पेस: वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंटसारखी टूल्स थेट ब्राउझरवर.
नेटवर्क-स्तरीय सुरक्षा: व्हायरस, मालवेअर आणि हॅकिंगपासून संरक्षण.
नेहमी अपडेटेड: नवीनतम सॉफ्टवेअर व फीचर्ससह सतत अद्ययावत.
जिओच्या म्हणण्यानुसार, जिओपीसी हा विद्यार्थी, फ्रीलान्सिंग व्यावसायिक, लहान व्यवसाय आणि घरून काम करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
कंपनीने याला ‘भारताची संगणक-सेवा-क्रांती’ असे नाव दिले आहे. महागडा संगणक खरेदी करण्याऐवजी वापरकर्त्यांना त्यांच्या टीव्ही स्क्रीनला संगणकात रूपांतरित करण्याची ही सुविधा डिजिटल भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
